छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : विकसित भारत जी राम जी विधेयक महात्मा गांधी यांच्या विचारांशी सुसंगत असून रामराज्याच्या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणले जात आहे. काँग्रेस व आघाडी पक्ष विधेयकास विरोध करीत आहेत. विकसित भारत व भगवान रामांचा काँग्रेस आघाडीला इतका द्वेष का आहे, असे प्रश्न उपस्थित करून २०४७ पर्यंत विकसित भारत होणारच, असा विश्वास खा. डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी (दि. १९) व्यक्त केला.
योवळी भाजप विभागीय कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आ. संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, इद्रिस मुलतानी उपस्थित होते. डॉ. कराड म्हणाले, मनरेगा योजनेचे नाव सुरुवातीपासून महात्मा गांधी यांच्या नावावर नव्हते. १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी सर्व जुन्या रोजगार योजनांना एकत्र करून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम हे नाव दिले. त्यानंतर राजीव गांधी यांनी जवाहर रोजगार योजना हे नाव ठेवले. सोनिया गांधी- मनमोहनसिंग सरकारने २००४ मध्ये नरेगा, तर २००५ मध्ये मनरेगा असे नाव दिले. काँग्रेस सरकारने जवाहर रोजगार योजना नाव बदलले तेव्हा पंडित नेहरुंचा अपमान झाला नव्हता का, असा प्रश्न खा.डॉ. कराड यांनी उपस्थित केला.













